Monday, January 5, 2015

विड्याचे पान

एका संध्याकाळी Indian restaurant मधून विडा विकत घेतला आणि घरी येउन fridge मधे ठेवून दिला. दोन तीन दिवस तिथे फिरकले पण नाही. तिसऱ्या दिवशी अचानक नजर गेली आणि चटकन हातात घेतला. चंदेरी foil मध्ये लपेटलेला तो विडा मी नाकाजवळ नेला आणि एक दीर्घ श्वास घेतला. तो सुगंध घेतला  आणि नजरे समोरून तीन चेहरे सरकन तरळून गेले. माझे तीन मामा . तीन तीन मामा होते माला . माझी आई त्यांची लाडकी बहिण. खरोखरच लाडकी. मामा लोकांना पान खायला आवडायचं .

तीनही मामा म्हणजे मूर्तिमंत प्रेम. लाड कसे करायचे हे कोणी त्यांच्या कडून शिकवे. किती करायचे त्याला काहीही मर्यादा नव्हती कधिच. काही लोकांना आठवल कि कश्या काही भावना जागृत होतात तसे मामा आठवले कि उब वाटते. प्रेमळ लाघवी बोलणे आठवते. मिठास …. मिठास म्हणतात त्याला … नसानसात इतके प्रेम कि डोळ्यातून पण तेच दिसायचे. आम्हा भाचे लोकांना ते लाडाची नावे ठेवायचे. लाडाची नावे आणि प्रेम हे इतक डोक्यात जावून बसलं न लहानपणी कि कुणी जर लाडच नाव ठेवलं नाही तर प्रेमच नाही असच equation बसलं घर करून मनात… गम्मत असते न …. शब्द कित्ती महत्त्वाचे असतात . मामा लोकांनी इतके लाडावले कि आम्ही म्हणजे जणू प्रेमाच्या पाकात मुरलेले गुलाब जाम झालो…

दिवाळी ची सुट्टी सुरु झाली कि आई ला उत्साह यायचा. भाउ बिजेच्या दिवशी भल्या पहाटे उठून ती बासुंदी चा घाट घालायची . तीनही मामांना बासुंदी प्रिय. अर्थात इतक्या गोड माणसांना आणखीन काय आवडणार म्हणा … तिघे जेव्हा मनसोक्त बासुंदी प्यायचे तेव्हा आईच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहायचा जणू . सुंदर माणसे आणि तितकेच सुंदर नाते … छोट्या गोष्टी पण तितकेच मोठे प्रेम …

जेव्हा एकेका मामला गमावलं  तेव्हा बालपणाला हळूहळू रामराम म्हटलं … एक अतुट नात , एक अद्वैत प्रेम , अनेक प्रेमळ सव्वाद , खूप काही राहिलेल्या अपूर्ण गोष्टी एका गाठोड्यात बांधून मनाच्या कोपऱ्यात ठेउन दिल्या… त्या सगळ्या ह्या एका विड्याच्या पानामुळे धुवाधार पावसागत कोसळून गेल्या … आणि राहिला फक्त एक सुगंध ….

1 comment:

  1. "प्रेमाच्या पाकात मुरलेले गुलाबजाम" व्वाह. ..

    आता काय बोलू. प्रत्येक सुट्टी मामाच्या गावात गेलीय माझी. परसात हे भलं मोठं कडू लिंबाचं झाड. त्यावर येणारे पोपटाचे थवे च्या थवे. दिवस होते ते.

    बरं ते काय कमी होतं म्हणून तू गुलाबजाम म्हणालीस. गोड ही माझी चव नाही. पण माझ्या लिखाणी गुलाबजाम हा गोड पदार्थ नाही. म्हणून मी ते कितीही खावू शकतो ... हो .... अगदी कितीही ... 53 चा विक्रम आणखी मोडीत निघायचाय. परवा 35 पर्यंत गेलेलो. मग वय वर्ष 39 आठवलं आणि थांबलो.

    असो ... सुरेख ... अगदी गुलाबजाम. .... गोड नव्हे :)

    ReplyDelete